राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज नवनवीन विषयावरून जुंपलेली दिसत आहे. हा सर्व गोंधळ सुरु असताना उद्या म्हणजेच (19 डिसेंबर)पासून नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. दुसरीकडे आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणं बहिष्कार घातला आहे. पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर केलं.
यावेळी अजित पवार म्हणाले की, हे अधिवेशन तीन आठवड्याचं घ्यावं अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत. आम्हाला चहापणाला उपस्थित रहा असं सांगितलं, मात्र 6 महिने सरकारं सत्तेवर आलं आहे. मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न 62 वर्षात कधीही झाला नव्हता. त्यावेळी पलीकडच्या राज्यांतील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक होती. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. उलट आत्ताचे मंत्री पुरेशी बाजू देखील मांडू शकले नाहीत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, कर्नाटक सीमाप्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहे. पण सध्याचं सरकार आल्यावर तो सुटण्याऐवजी तो अधिक चिघळला. उलट महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करू लागले.अशी हिंमत याआधी कुणाची झाली नव्हती पण आता हे सगळं घडतंय. आमचा विकास होणार नसेल तर आम्ही इतर राज्यात जाऊ अशी भूमिका काही गावं घेऊ लागली, हे शिंदे फडणवीस सरकारचं अपयश आहे, असं अजित पवार म्हणालेत.