नागपूर : सुप्रीम कोर्टाचा व राज्यसरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून दिला आहे हा पदाचा दुरुपयोग आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
सभागृहात मुख्यमंत्र्यांनी एनआयटीप्रकरणात दिलेल्या निर्णयासंदर्भात चर्चा केली. परंतु, आताच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असे निरीक्षण नोंदवले आहे, असेही अजित पवार म्हणाले. अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते आणि आमच्या मंत्रीमंडळात एकनाथराव होते आणि तेच मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात तुम्हाला सोयीचं चालतंय आणि नसेल ते आमच्यावर ढकला वा रे पठ्ठे, अशा शब्दात सत्ताधारी आमदारांनी केलेल्या वक्तव्याला अजित पवार यांनी उत्तर दिले.
सिल्लोड कृषि प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याची बातमी लोकशाही मराठी न्यूजने दाखवली होती. याची दखल घेत अजित पवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना रोखत नियमाची आठवण करुन दिली. त्यावर अजित पवार म्हणाले की, मी नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हीदेखील फडणवीस, शिंदे विरोधी पक्षात असताना हे पाहिलं आहे. कोर्टाने ताशेरे ओढलेले असतानाही कृषीमंत्र्यांनी त्यांचे ऐकलं नाही. जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिवांना कळवलं नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
कृषी विभागाला वेठीस धरण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कृषीला पाच हजार रुपये वसूल करुन देण्यास सांगितले आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का? याकरता मंत्री केलं आहे का, असे प्रश्न त्यांनी विचारले आहे.
दादा भूसे कृषीमंत्री असताना असे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्याबद्दल काही दुमत नाही. पण, त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहे. हे सर्व प्रकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. त्या मंत्रिमंडळात तुम्हीही आहात. तुमच्याकडे फार अपेक्षेने महाराष्ट्र पाहतो. तुम्ही ठरवलं तर राजीनामा घेऊ शकता, असे अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हंटले आहेत.