विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून, उद्या या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वी एक दिवस आधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी झालेल्या शब्दीक चकामकीचे रुपांतर चक्क धक्काबुक्कीपर्यंत गेल्याचा धक्कादायक प्रकार आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने पाहिला. तसेच यावेळी अधिवेशनात अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाल्या. तसेच मी ठाण्यातील डान्सबार स्वत: फोडले. त्यामुळे मला गुंडांनी टार्गेट केलं होतं. पण आनंद दिघे यांनी मला वाचवलं. बार डान्स फोडणारा मी पहिला नेता आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार सांगताना दिसत असतात. शिंदे यांच्या या विधानाचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (ajit pawar eknath shinde over dance bar issue)
मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर सोळा डान्स बार फोडणारा मी आहे असे छातीठोक सांगितले. मात्र आता तुमच्या घराच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर डान्स बार सुरू आहेत. अनेक प्रसारमाध्यमांनी याची चित्रफीतही दाखवलेली आहे. आमच्या काळात डान्स बार बंद केले होते. मात्र आता सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात. कशाची मस्ती आलीय एवढी? दुसऱ्या एका आमदाराने अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली. कायदा समान आहे हे मला सांगावं लागतंय. आमदारांचं हे वागणं चुकीचं आहे. त्यामुळे सर्वच आमदार असे वागतात की काय असा मेसेज जातो, असं म्हणत त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर ताशेरे ओढले.