नागपूर : हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे पाचव्यांदा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दिशा सालियन प्रकरण झाले. त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास केला आणि तिने आत्महत्या केली, असे त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये कुणाचाही संबंध नाही. असे सीबीआयने स्पष्ट केले. जे प्रकरण संपले आहे तरी ते पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो. आम्हाला या विषयी बोलायला दिले जात नाही. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
केंद्र सरकारच्या हातात सीबीआय आहे. मग, त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे लोकशाहीला घातक आहे. याचा तीव्र निषेध अजित पवार यांनी नोंदवला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील. प्रतिज्ञापत्र आल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालली आहे, असा आरोपही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला
दरम्यान, भरत गोगावले यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर नितेश राणेही बोलायला उभे राहिले. A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.