मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यानंतर सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असून सर्वपक्षीयांकडून भूमिका मांडण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाची कामं गतिमान होतील अशी सभागृहाची अपेक्षा आहे. राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला जवळ करतात. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही, असे मिश्किल भाष्य त्यांनी केले.
याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावरुन पाहिलं तर समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं. दीपक केसरकर तर आता प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, असा टोलाही अजित पवारांनी केसकरांना लगावला आहे.
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेत्यांना रडू कोसळले. गिरीश महाजन तर डोक्यावरच्या फेट्यानेच अश्रू पुसत होते, असे चिमटे अजित पवारांनी भाजपला काढले. तर, एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.