मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिविगाळ प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून सांगितल होतं की वाचाळवीर वाढत आहेत, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, मी दिवाळीपूर्वीच फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतली होती. सध्या तुमच्या पक्षात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलेलं आहे. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं तो पक्षाचा अधिकार आहे. पण ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलत आहेत. त्यातून सरकारची प्रतिमा खराब होते आहे. तसेच, राज्याच्या नावलौकिक ढासळू देता कामा नये. महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे.
मंत्री काहीही वक्तव्य करत आहेत. चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पाहिजे का, असं विचारण्यापर्यंत मजल गेली आहे. नंतर मी हे सहज म्हणालो, असंही बोलतात. हे सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांना फैलावर घेतले.
ते पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून प्रशासन पूर्णपणे ठप्प पडले आहे. आम्ही होतो तेव्हा वेळेवर बैठका होत होत्या. परंतु, हे सरकार आल्यापासून पोलीस विभाग खूप तणावाखाली काम करत आहे. प्रशासन व्यवस्थित चालयला हवं ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं काम आहे. परंतु, हे असच सुरु राहिलं तर सरकारं चालवणं अवघड होईल. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना जे काही चुकत आहे ते सांगायला हवं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दिवाळीनिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने गरीबांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. परंतु, पुरवठ्याअभावी अनेक नागरिकांना शिधापासून वंचित राहावे लागले होते. यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आनंदाचा शिधा हा मनस्तापाचा शिधा झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अजूनही शिधा मिळालेला नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून पत्र देणार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.