मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चिन्हाचा फोटो ट्विटरवरुन हटविला आहे. यामुळे अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही उलट-सुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशातच, अजित पवारांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्द्ल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
कारण नसाताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्द्ल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक सुरु आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. मविआची सभा आटोपून नागपूरमध्ये परत येत असताना उध्दव ठाकरेंबरोबर मी आलो. माझ्याबद्दलच्या बातम्यांमध्ये यथ किंचिंतही तथ्य नाही. कोणत्याही 40 आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादीचेच आहोत. राष्ट्रवादीतच राहणार आहोत. यामुळे बातम्यांना कोणातही आधार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
माझ्या ऑफिसमध्ये मंगळवार, बुधवार कमिटीच्या मिटींग असतात. यामुळे आज आमदार भेटायला आले होते. ती नेहमीची पध्दत आहे. त्यांची वेगवेगळी कामे होती. ती करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले.
ध चा मा केला जातोय. राष्ट्रवादी सोडणार असेल तर मीच स्वतः सांगेल ज्योतिषाची गरज नाही, काही विघ्नसंतोषी माणसं बातम्या पेरण्याची काम करत आहेत. ती आमच्या पक्षातील नाही. माझ्याबद्दल पक्षात कोणालाही आकस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बातम्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता संभ्रामवस्थेत जातो. परंतु, मी त्यांना सांगू इच्छितो काही काळजी करु नका. शरद पवारांच्या अध्यक्षतेत राष्ट्रवादीची स्थापना झालेली आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले. परंतु, काही बातम्या जाणीवर्वक पसरवल्या जात आहेत. त्याच्यामागे राज्यातील जनतेपुढील महत्वाचे प्रश्नांवरुन दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी प्रसत्न केले जात आहेत, अशी टीकाही अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे