पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. परंतु, यावेळी अजित पवार वगळता सर्वच नेत्यांनी शरद पवारांशी हातमिळवणी करत संवाद साधला. मात्र, अजित पवार गुपचूपणे शरद पवारांच्या पाठीमागून निघून गेले. यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले होते. यावर अजित पवारांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.
आपण परिवार तो परिवार, राजकीय भूमिका वेगळी असू शकते. साहेबांचा आदर करतो म्हणून मागून गेलो. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करताना भीतीने पाठीमागून जातो. त्याप्रमाणे मीही गेलो. त्यांचा आदर करतो म्हणूनच मी पाठीमागून गेलो, असे अजित पवारांनी सांगितले आहे. तसेच, साहेबांनी सांगितले तरी आम्ही शरद पवार यांचे फोटो लावणारच, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तर, कार्यक्रमाचा काहीही संभ्रम नव्हता. अनेक मोठ्या लोकांना पुरस्कार दिला होता. मोदी यांना पुरस्कार देताना शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. राजकीय घटना घडण्याअगोदर हे सगळं झालं होतं. टिळक पुरस्कार नियोजित होता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मी सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्र सर्वांगीण विकासासाठी गेलो आहे. राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडून करवून घेता येतील. अनेक शेतकरी विद्यार्थी रस्ते प्रश्न सोडवून घेता येतील त्यासासाठी मी सत्तेत गेलो आहे. पाणी शेती आणि पिण्यासाठी कमी पडत आहे त्यासाठी इतर कुठून पाणी आणता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. पुणे नाही तर राज्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.