चेतन ननावरे | मुंबई: ग्रामीण सक्षमीकरणाद्वारे राज्यातील एक हजार गावांना स्वयंपूर्ण करणाऱ्या ‘स्वदेस ड्रीम व्हिलेज’ या उपक्रमाच्या विस्तारासाठी आज महाराष्ट्र शासन आणि स्वदेस फाऊंडेशन यांच्या दरम्यान सहकार्य करार करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
या करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक तसेच स्वदेस फाऊंडेशनच्या संस्थापक संचालक श्रीमती झरीन स्क्रूवाला यांनी स्वाक्षरी केल्या. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रिया खान, स्वदेस फाऊंडेशनचे रॉनी स्क्रुवाला आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या विस्तारानुसार स्वदेस फाऊंडेशन पुढील पाच वर्षांत राज्यातील एक हजार गावांना स्वयंपूर्ण करून त्यांचा कायापालट करणार आहे.
यापुर्वीच फाऊंडेशनने रायगड जिल्ह्यामधील सात तालुक्यातआणि नाशिक जिल्ह्यामधील चार तालुक्यांत ग्रामीण सक्षमीकरणाचे काम सुरु केले आहे. त्याचाच विस्तार आजच्या करारानुसार करण्यात येणार आहे. यात आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाणी, स्वच्छता सुविधा यांसह आर्थिक विकास साधण्यावरही भर देण्यात येणार आहे. सामुदायिक सहभागावर आधारित विकास अशी संकल्पना यात अभिप्रेत आहे.
या करारानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वदेश फाऊंडेशन व शासनाच्या सहभागी विविध यंत्रणांना हा स्वप्नवत् उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या.