मुंबई : राज्यात सध्या मोठी राजकीय उलथपालथ सुरु आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. अशातच ठाकरे कुटूंबियांची महत्वाची व्यक्ती अद्यापही या प्रकरणावर शांत आहे ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे.
राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्याचा त्रास वाढला होता. त्यासाठी त्यांनी मुंबईत काही वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यानंतर हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यासाठी राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौराही पुढे ढकलाला होता. अखेर त्यांची हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
राज ठाकरे यंनी स्वतः ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली आहे. काही वेळापूर्वीच रुग्णालयातून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपला आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असू द्या, अशा आशयाची पोस्ट करत राज ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठा राजकिय भूकंप आला आहे. यामुळे महाविकास आघाडीची सत्ता गेल्यात जमा आहे. अशात या सर्व प्रकरणावर शांत असणारे राज ठाकरे सक्रिय होणार का, शिंदे बंडावर त्यांची प्रतिक्रिया काय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.