सोलापूर : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची आज सोलापूर येथे पत्रकार परिषद सुरु असताना त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाई फेक करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला सदावर्ते संबोधित करताना असतानाच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. व काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते त्यांच्यावर शाई फेक केली.
शाईफेकीच्या घटनेवर संभाजी ब्रिगेड काय म्हणाले,
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचं नाव सोमनाथ राऊत असून ते सोलापुरातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. आज संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते हे महापुरुषांच्या या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. या महाराष्ट्रातला लहानातला लहान कार्यकर्ता म्हणून या गुणरत्न नव्हे तर गुणउधळे सदावर्तेचा निषेध करत आहोत. सदावर्ते यांना महाराष्ट्रात कुठेही फिरु देणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
सोमनाथ राऊत यांनी म्हटले की, मी त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्यावर शाई फेकून काळे कापड दाखवून निषेध केला आहे. सदावर्ते म्हणजे भाजपचं पिल्लू आहे. महाराष्ट्र तोडायचा असं भाजपने ठरवलेलं आहे. पण आम्ही ते होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
स्वतंत्र मराठवाड्याची मागणी
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भ राज्याची मागणी केली होती. त्यांचा राज्यकारभार स्वतंत्रपणे चालला पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी त्यांनी शुक्रवारी उस्मानाबादमध्ये परिषदही घेतली. या संवाद परिषदेआधीच वातावरण तापले होते.