राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्लेकिल्ल्यात शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. याच वेळी आदित्य ठाकरेंनी या मेळाव्यात बोलत असताना शिंदे गटावर आणि राज्यसरकार जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू करून देण्यात आला. कारण महाराष्ट्रात बेरोजगार वाढत चालले आहेत. देशातही बेरोजगार युवकांकडे कुणी लक्ष देत नाहीय. राजकीय पक्ष हे ५० वर्षांपूर्वी काय झालं. १०० वर्षांपूर्वी काय झालं, याकडं लक्ष देत आहेत. त्यासाठी भांडत बसले आहेत. तरुणांसाठी लढणारा किंवा पुढची ५० वर्षांसाठी लढणारा अजून दिसत नाही. तिथं शिवसेनेनं काम सुरू केलंय. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, पुण्यात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महिलांवर अत्याचार वाढत चालले. त्यांचा आवाज कुणी ऐकत नाहीय. महाराष्ट्रात मोघलांचे सरकार आहे, असेच दिसत आहे. स्वतःचे खोके आणि दुसऱ्यांना धोके, असं सुरू आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली.