छत्रपती संभाजीनगर : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये चार दिवसांत शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. आदित्य ठाकरे उद्या या तीनही रुग्णालयांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. याआधी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. तुमच्यात राजीनामा देण्याची हिम्मत नाही. मंत्रीमंडळावर आरोग्य मंत्री ढकलतात, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारी रुग्णालयात आमच्याकडे औषधं नाही, असे वातावरण समोर आले आहे. आम्ही पण आंदोलन मोर्चे काढू शकलो असतो. आरोप लावायला आंदोलन करायला न येता परिस्थिती समजून घ्यायला आलो. परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. याच डॉक्टर आणि नर्समुळे कोविड काळात महाराष्ट्राच कौतुक झालं.
या बातम्या आल्यानंतर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री दिसले नाही. तुमच्यात राजीनामा देण्याची हिम्मत नाही. तुमच्यात लाज राहिली नाही. मंत्रीमंडळावर आरोग्य मंत्री ढकलतात, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत टोलवर भाष्य केलं आहे. सगळ्या सरकारने टोलमुक्तीच्या फक्त थापा मारल्या. सरकार थापा मारणार आपण ऐकत बसायचे. प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारले असल्यास त्यांनी बोलणे टाळले आहे.