मुंबई : ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. याच्या निषेधार्थ आज ठाण्यात माहविकास आघाडीने मोर्चा काढला होता. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री यांचं कौतुक करण्यासाठी आरतीची थाळी घेऊन यायला विसरलो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून काही तासांचे आहे. सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला जे कुणी आयएएस, आयपीएस अधिकारी मदत करत आहेत. जे लोक सरकारचे चिलटे म्हणून काम करीत आहेत, त्यांना आमची सत्ता आल्यानंतर तुरुंगात टाकले जाईल. ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा कार्यक्रम आम्ही राबवू. हाच निश्चय करण्यासाठी आज आम्ही आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर आलो आहोत.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ते म्हणाले, शर्ट खालती-वरती करीत, वर-खाली बघून दाढी खाजवत ते महिलांबद्दल अभद्र भाषा बोलतात. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हावभावावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अनेकांनी वन्स मोअरचे नारे दिले. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, वन्स मोर नाही असली माणसं पुन्हा नको.
गुंडगिरी करून ठाण्याला बदनाम केलं जातंय. मारहाण केलेल्या महिलेवर उलट गुन्हे दाखल केले जाताहेत. शर्ट खाली खेचत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. मी आव्हान दिलं ठाण्यात येऊन लढतो. मला तुम्ही ठाणेकर स्वीकारणार का, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थितांना विचारला.
मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात फेसबुक लाईव्ह करण्याचं ठरवलं. उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुक लाईव्ह वरून भाजप टीका करत होते. पण, फेसबुक लाईव्ह करत आम्ही सुरत, अहमदाबाद केलं नाही. फेसबुक लाईव्ह चोरण्याचा प्रयत्न केला. जसं पक्ष आणि नाव चोरलं. ठाकरे आडनाव मिळतं का बघण्यासाठी दिल्लीत गेले. एक दिवसात फेसबुक लाईव्ह केलं आणि पंतप्रधान बदलून टाकले, अशी जोरदार टोलेबाजी आदित्य ठाकरेंनी केली आहे.