मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौरा (Ayodhya Tour) दौऱ्यावर असून ते लखनऊ विमानतळावर पोहोचले आहेत. आम्ही रामलल्लांचे दर्शन घ्यायला आलो आहोत, कोणताही राजकिय विषय नाही, असे विधान त्यांनी यावेळी केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, अयोध्या भारताच्या आस्थेचा विषय आहे. तसेच, आमच्याही आस्थेचा विषय आहे. आम्ही अयोध्येत केवळ रामलल्लाचे दर्शन घ्यायला आलो आहोत. कोणताही राजकिय विषय नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तसेच, देवळात गेल्यावर काही मागण्यापेक्षा मी नेहमी आशीर्वाद घेतो. व जे काही आतापर्यंत सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यासाठी आभार व्यक्त करतो. व पुढे जे काही कार्य घडायचे असेल ते चांगले होऊ दे. एवढेच आमचे मागणे असते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आम्ही 2018 पासून अयोध्येत येतो. ही राजकारणाची नाही तर रामराज्याची भूमी आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली असून त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत. तर, बँड-बाजासह आदित्य यांचे स्वागत होणार आहे.