मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार अस्थिर होऊ लागले आहे. याचे संकेतही आदित्य ठाकरे यांनी स्वतःच दिले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर बायोमधून मंत्री पदाची माहिती हटवली आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत संसार थाटण्याची शक्यता आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर बायोमधून पर्यावरण मंत्री पदाची माहिती हटवली आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तर आज कॅबिनेट बैठक असून या बैठकीत राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असे सांगितले आहे. यावरून ठाकरेसरकार कोसळण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.