गिरीश कांबळे | मुंबई : सण-उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याची घोषणा शिंदे सरकारने केली होती. यानंतर बसेस, होर्डींग्सवर हिंदू सणावरचे विघ्न टळले, आपले सरकार आले, अशी जाहिरात शिंदे सरकारने केली आहे. यावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. सण-उत्सवाच्या वेळेस राजकारण करणं हे बालिशपणा असल्याचे त्यांन म्हंटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दक्षिण मुंबईतील कुलब्याचा युवराज, फोर्टचा इच्छापूर्ती, अखिल चंदनवाडी, गिरगावचा महाराजाचं दर्शन घेतलं. दरम्यान, 'कुलब्याचा युवराज' बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोणी राजकारण करत असेल हे सर्व लोकांना दिसत आहे. लोकांना राजकारणाचा कंटाळा आला आहे. सध्या सगळीकडेच राजकारण सुरू आहे. सगळीकडे सुरू असलेलं राजकारण हे कोणालाही पसंत येत नाही. कोणाच्या आशीर्वादामुळे नाहीतर गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे सर्व सुरू आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सुरू असलेल्या जाहिरातबाजीवर टीका केली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला केल्या मारहाणीवर देखील भाष्य केलं. हा घाणेरडा प्रकार होता. मी पाहिलं अगदी राग येण्यासारखा तो प्रकार आहे. कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो मात्र असं करणं योग्य नाही. कडक कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई लोकांना दिसली पाहिजे. महिलेवर हात उचलणे हे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.