मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीचे अनेक प्रकल्पांवर स्थगिती आणण्यात आली. आता आणखी एका प्रकल्पाची जमीन आता नगर विकास खात्यासाठी देण्यात आली आहे. यावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबई ही त्यांना सोन्याची अंडी घालणारी कोंबडी दिसते, असा निशाणा आदित्य ठाकरेंनी साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाचा एक जीआर शेअर केला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार या जमिनीवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय, भूमिगत कार पार्क, मोकळी जागा आणि अर्बन फॉरेस्ट तयार करणार होती. सर्व काही निधी उभारण्यासाठी होत नसते. आपण राहणीमानही उंचावले पाहिजे.
दुर्दैवाने हे सरकार महाराष्ट्रविरोधी आहे आणि त्यांना मुंबई सोन्याची अंडी घालणारी कोंबडी दिसते. मुंबई ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. अशा स्वार्थींना आम्ही आमचे शहर विकू देणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
दरम्यान, वरळीतील मुंबई डेअरी किंवा मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे जागतिक दर्जाचं मत्स्यालय महाराष्ट्रात तयार करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नुकतीच वन, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. ही घोषणा होताच तीनच आठवड्यात आदित्य ठाकरेंनी मोठा खुलासा केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.