मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणं सुरू आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. आपण काम करणं गरजेचं आहे, हेही ते विसरून गेले आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणं सुरू आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. त्यामुळे या सरकारला घोषणा सरकार, खोके सरकार अशी अनेक नावं मिळाली आहेत. आपण काम करणं गरजेचं आहे, हेही ते विसरून गेले आहेत.
आधी गणपतीमध्ये फिरले, मग नवरात्रीमध्ये आणि आता दिवाळीमध्ये फिरतायेत. दहीहंडी वेळी केलेल्या घोषणांचे काय झाले? त्याचा जीआर निघाला का? आणि आता शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. पण त्यांना नुकसान भरपाई दिली का? ओला दुष्काळ जाहीर केला का, असे सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारले आहे.
भाजप समर्थित आमदार रवी राणा यांनी शिंदे समर्थित आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहटीला कोट्यवधीचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. याविरोधात बच्चू कडूंनी थेट पोलीस स्थानकात थेट तक्रार दाखल केली आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांच्या दोन आमदारांमध्ये खोके वाटपावरुन वाद झाला असं मी ऐकलंय. कोणाला जास्त मिळाले यावरून बहुतेक झाला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
तर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सध्या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष देत आहे. दहीहंडी, दांडीया नंतर भाजपने वरळी येथील जांभोरा मैदानात मराठमोळ्या दीपोत्सव आयोजित केला आहे. यावरुनही आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपला मी पुढच्या माझ्या कार्यक्रमांची यादीच आता पाठवतो म्हणजे त्यांना तस करता येईल. आणि वेळ आली कि आम्ही बोलूच, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.