राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये देखील वाद सुरुच आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी दिवसांदिवस वाढतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. सत्तांतराच्यावेळी शिंदे गटातील आमदारांसोबत गेलेले. परंतु, गुवाहाटीला न जाता सूरतहून परतलेले आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली आहे. देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. त्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देशमुखांना देण्यात आले आहेत.
काय म्हणाले नोटीसनंतर देशमुख?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या संदर्भात मला 17 तारखेला अमरावतीला बोलावलं आहे. मी 17 तारखेला अमरातीला एसीबीच्या ऑफिसला जाईल. माझं म्हणणं काय आहे ते त्यांच्यासमोर मांडेल. पण एसीबीची नोटीस देण्यात आली त्याविषयी तक्रार नेमकी कुणाची आहे, त्यावर एसीबीचं काय म्हणणं आहे, आमच्याकडे कोणती मालमत्ता आहे, याबाबत कोणतंही स्पष्टीकरण नाही. आमदाराला नोटीस बजवायची पण तक्रारदार कोण? तो कोणत्या वृत्तीचा? त्याचं नावही आम्हाला माहीत नसतं. याबाबत मी रितसर 17 तारखेला पत्रकार परिषद घेईन आणि माझं स्पष्टीकरण मांडेन. असे देखील नितीन देशमुख यावेळी म्हणाले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या विरुद्ध अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यात आली होती. देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, यांसह अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करीत अकोल्यातील एका व्यक्तीने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.