मुंबई : शिवसेना फुटीनंतर राज्यात खोक्यांवरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. विरोधकांकडून सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर खोक्यांचा आरोप करत आहेत. एवढेच नव्हेतर सत्तेतीलच भाजप समर्थित आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्याचा आरोप केला होता. यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर टीका करताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली आहे.
झाले असे की, सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, असे उत्तर दिले. यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ माजली असून अब्दुल सत्तारांवर टीका करण्यात येत आहे. तर, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, याआधीही अब्दुल सत्तार अनेकदा वादग्रस्त वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती होती. तर, जिल्हाधिकाऱ्यांनाही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले होते. तर, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हेही अनेकदा वादात सापडले आहेत. केवळ तीन महिनेच झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांचे मंत्री अडचणीत आणत असल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.