सचिन बडे | औरंगाबाद : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींच्या नावाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली असून आमची चूक असेल तर शिक्षा करा, असे म्हंटले आहे.
टीईटी परीक्षेमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नावे आली असता त्यांनी आमची जर चूक असेल तर आम्हाला शिक्षा करा. मात्र, आम्ही चुकी केली नसून राजकीय द्वेषापोटी आम्हाला बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला आहे.
माझ्या मुली 2017 मध्येच संस्थेत नोकरीला लागल्या होत्या. त्यानंतर मुलींनी 2020 मध्ये परीक्षा दिली होती. तेव्हा माझ्या मुली या नापास झाल्या होत्या. परंतु, जर आम्ही फायदा घेतला असेल तर कारवाई करा. मात्र, कोणी जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्यासाठी खोटी माहिती पसरवत असतील तर त्यांना फासावर लटकवा, अशीही मागणी सत्तार यांनी केली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टीईटी परीक्षेत ७ हजार ८०० विद्यार्थी बेकायदेशीरपणे पास झाल्याचे उघड झाले होते. या बोगस शिक्षकांची नावे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींच्या नावांचा समावेश आहे. हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या मुलींची नावे आहेत. या दोन्हीही मुली सत्तारांच्या औरंगाबाद जिल्हातील शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत. परंतु, आता दोन्ही मुलींची नावे पुढे आल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.