मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाचे आमदार व खासदारांच्या कुटुंबासह गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी शिंदे गट जात आहेत. परंतु, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह तीन-चार मंत्र्यांनी गुवाहटीला न जाता राज्यात राहणे पसंत केल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर सत्तार यांनी स्वतः भाष्य केले आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले, कोणत्याही मंत्र्यांची नाराजी नाही. मी नाराज कधीच करत नाही. मी पुन्हा एकदा जाईल दर्शन घेईल. माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. पण, गेल्या 42 वर्षापासून राजकारणात आहे. एवढी मोठं पद मिळाली याच्यापेक्षा अजून दुसरा काय? मग मी नाराज कसा असू शकतो. मी कृषी प्रदर्शनाला वेळ दिली होती. पूर्वनियोजित कार्यक्रम होता. मुख्यमंत्री गेले म्हणजे सगळा महाराष्ट्र गेला. मुख्यमंत्र्यांवर कुणाचाही विश्वास कमी झालेला नाही उलट तो वाढला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
शिंदे गटापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून येणाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मी अनेक वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात होतो. त्यामुळे तिकडच्यांची नाराजी मला चांगली दिसते. ते मला म्हणतात मुझको भी लिफ्ट करा दे मै बोला ठहरो, असे त्यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदेंनी ज्योतिषीला हात दाखवल्याच्या चर्चा मध्यतंरी रंगल्या होत्या. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी हात दाखवला की नाही हे त्यांना विचारा. त्यांच्या मनगटात खूप ताकत आहे. त्यांना कुणाला हात दाखवायची गरज नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार दोघे मिळून घेतील. घर चालवताना देखील नाराजी होत असते. कोण कुणाला हात दाखवतो हे निवडणुकीत बघू. त्यांची निशाणी हात आहे, असा निशाणाही त्यांनी शिवसेनेवर साधला आहे.
तर, कामाख्या देवीच्या दर्शनाला हे कोणाचा बळी द्यायला चालले आहेत?, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला होता. याला अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रेड्याचा बळी देणे ही धार्मिक भावना आहे. अजित पवार अजून तिकडे गेले नाही. अजित पवारांनी त्यांच्या बारामतीचा एखादा रेडा घेऊन जाऊन बळी द्यावा, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.