औरंगाबाद : शिवसेनेने (ठाकरे गट) आजच्या सामना रोखठोकमधून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला आहे. शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असा टोला सत्तारांनी लगावला आहे. तसेच, उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरही त्यांनी टीका केली आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, 22 आमदार नाराज हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. ते कधी खरे होत नाहीत. हे लोक गणपतीला आठवत बसले आहेत. कधीतरी हे 22 आमदार नाराज होतील. त्यांच्या पोटात जो पोटशूळ उठलेला आहे. तो कमी होईल. त्यांच्याकडे जे उरलेले 15 आमदार आहेत. ते त्यांनी सांभाळले तरी फार झालं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
शिवसेनेकडील 55 आमदारांची फौज होती. त्यापैकी 40 आमदार शिंदे गटात आहेत. उद्धव ठाकरेंकडे फक्त 15 आमदार राहिलेत. हे लोक आपल्याला सोडून का गेले त्यांनी चिंतन करायला हवं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
उध्दव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरही अब्दुल सत्तारांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी निश्चितपणे रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. पूर्वी शेतकरी गोरगरिबांना मदत करायला हवी होती ती न केल्याने ही वेळ आली.
मी त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पाहिला. त्यानंतर असं दिसून आलं की २४ मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.