भिवंडी : शहरातील लाहोटी कंपाऊंड परिसरात भाजपा नगरसेवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात नगसेवकाच्या कारवर 20 ते 25 जणांच्या टोळक्यांनी हल्ला केल्याचे समजत आहे. यामध्ये नगरसेवक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
भाजपा नगरसेवक नित्यानंद नाडार यांचे लाहोटी कम्पाऊंड येथे कार्यालय आहे. आपल्या कार्यालयातील काम संपवून ड्रायव्हर व बॉडीगार्ड सोबत नित्यानंद आपल्या खाजगी कारमधून घरी जाण्यासाठी निघाले. कार्यालयापासून 100 फुटावर रस्त्यात कार थांबली असता त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळक्यांनी अचानक त्यांच्या गाडीवर दगड व लाकडी दांडक्याने हल्ला चढविला. गाडीची काच फोडली व नित्यानंद नाडार यांच्यावर सुद्धा हल्ला केला. या हल्ल्यात नित्यानंद नाडार हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकार जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
दरम्यान, हा हल्ला पक्षाच्या अंतर्गत वादातून झाला असल्याचा आरोप नगरसेवक नित्यानंद नाडर यांनी केला आहे. पक्षात लॉबिंग सुरू असल्याचे याबाबत मी पक्षातील वरिष्ठांना याबाबत सांगितले होते. तरी माझ्यावर हल्ला झाला असल्याची माहिती नित्यानंद नाडार यांनी दिली आहे. या संदर्भात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या टोळक्यांचा शोध सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सुरू केला आहे. याप्रकरणी एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली. मात्र, हा हल्ला नेमका पक्षांतर्गत कोणत्या वादातून झालाय हे अजूनही स्पष्ट झालेल नाही.