औरंगाबाद : राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधींना मनसैनिक भारत जोडो यात्रेत काळे झेंडे दाखवणार होते. परंतु, त्याआधीच पोलिसांनी मनसेचा ताफा चिखली येथे अडवला असून धरपकड करत आहेत.
सकाळी सहा वाजता अकोल्यातील कुपट बाळापूर येथून पदयात्रेला सुरूवात झाली असून बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. दरम्यान, दुपारच्या सत्रात चार वाजता शेगाव इथं गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता. यानुसार राज्यभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु, पोलिसांनी मनसैनिकांचा ताफा चिखली येथे अडवला आहे. याविरोधात मनसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. तर, पोलिसांनी मनसे नेते नितीन सरदेसाईंना ताब्यात घेतले असून मनसैनिकांचीही धरपकड सुरु केली आहे.
यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे. मनसे सैनिकांच्या पोलिसांनी गाड्या अडवल्या तरी आम्ही पुढे जाणार असा पावित्र्याच मनसे सैनिकांनी घेतला आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे तर आम्हाला आंदोलन आणि निषेध करण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
दरम्यान, नागपुरातही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनिकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.