मुंबई : सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रभर उमटत आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र माझ्याकडे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. इंग्रजीत असलेल्या या पत्रात, सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ, असं लिहिल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. याविरोधात भाजप-शिंदे गट आख्रमक झाली असून राहुल गांधींवर टीकेची झोड उडवली आहे. यामुळे, राहुल गांधी यांच्याविरोधात शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केलं आहे. त्यामुळं स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं वंदना डोंगरे यांनी म्हटलं आहे. तर, याआधी भिवंडी येथील प्रचार सभेत राहुल गांधींनी आरएसएसबद्दल वक्तव्य केलं होते. याविरुद्धही त्यांच्यावर भिवंडीमध्येही गुन्हा दाखल झाला होता.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.