मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवारी पार पडली. या बैठकीत २८ महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. यामध्ये पोलीस पाटलांच्या आणि आशा सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता पोलीस पाटलांना दरमहा १५ हजार रुपये मानधन मिळणार असून आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून अतिरिक्त ५ हजार रुपये देण्यात येणार आहे.
पोलीस पाटलांच्या संघटनेकडून मानधन वाढवण्यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली जात होती. त्यामुळे आता राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ केलीय. तसच आशा सेविकांनाही ५ हजार रुपये मानधन वाढवण्यात आलं आहे.
दरम्यान, आतापर्यंत पोलीस पाटलांना दरमहा 6 हजार 500 रुपये मानधन मिळत होते. आता त्यांना महिन्याला 15 हजार रुपये मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याची मागणी होत होती. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरला जात होता. अखेर आता पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.