भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यात एकच निषेध व्यक्त केला जात होता. हा विरोध चालू असताना काल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. त्या शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. परंतु, मनोज गरबडेवर दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्याता वर्तवली जात आहे.
मात्र, आता या गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमावरुन राज्यात नवा वाद सुरु झाला आहे. या संदर्भात अॅड. असिम सरोदे यांनी ट्वीट करत पोलिसांनी लावलेल्या कलमांवर आक्षेप घेतला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की ''शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे. यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध'', असे सरोदे यांनी म्हटले आहे.
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, 'मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम 326 शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठी सुद्धा 10 वर्षे (किंवा जन्मठेप) अशी शिक्षा होऊ शकते मग शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले? इतकाच प्रश्न आहे. असा सवाल त्यांनी केला आहे.
' कुणावर तरी शाई फेकणे, बूट किंवा चप्पल मारून फेकणे हा राग व्यक्त करण्याचा,इन्स्टंट न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत बसत नाही. चंद्रकांत दादांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडले तो अभिव्यक्तीचा गैरवापर व चुकीची अभिव्यक्ती आहे, ते गौरवर्तन आहे. शाईफेक प्रकरण म्हणजे गैरवर्तनाला गैरवर्तनाने उत्तर देण्याचा अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे पण म्हणून सत्तेचा वापर करून अनावश्यक कलमे लावणे हा न्यायतत्वाचा अपमान आहे. ते असीम सरोदे यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.