मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर, आजच शिवसेना पक्षप्रकरणी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. यामुळे आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. अशात कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांनी मत मांडले आहे. कायद्यानुसार हे लोक अपात्र झाले तर कुठलाही मंत्री राहणार नाही किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री राहता येणार नाही, असे मोठे विधान उल्हास बापट यांनी केले आहे.
पक्ष प्रणाली हा आपल्या लोकशाही आत्मा आहे. नेत्यांचे आयाराम गयाराम मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पक्षातंर बंदी कायदा करण्यात आला. यामुळे याची अचूक व्याख्या सर्वोच्च न्यायलयाने आज करणे हे अत्यंत गरजेचे आहे, असे मला वाटते. सुप्रीम कोर्टातील आजचा निकाल भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्टाला आज सोळा आमदारांचा अपात्रतेच्या बाबतचा निर्णय पहिल्यांदा घ्यावा लागेल. नियमानुसार सगळेच आमदार एकत्र बाहेर पडले पाहिजे पण हे एक एक करत गेले आहेत त्यामुळे हे कायद्यात बसणार नाही. १६ आधी गेले त्यामुळे ते अपात्र होणारच आहे. यामुळे बाकीचे देखील अपात्र होतील.
बाहेर पडणारे लोक आम्हीच शिवसेना असं म्हणत आहेत हा अत्यंत हास्यास्पद विषय आहे. खरी शिवसेना कोणती हे पार्टीमध्ये ठरवावे लागतं ते विधानसभेत ठरवता येत नाही. खरी शिवसेना कुठली हे निवडणूक आयोगच ठरवेल. त्यानुसारच चिन्ह कुणाला द्यायचं हे देखील अधिकार निवडणूक आयोगाकडेच आहेत.
हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे का पाठवलं जात आहे हेच कळत नाही. आजचा जो काही निर्णय पाच जणांनी दिला तर तो महाराष्ट्रासाठी बंधनकारक राहील मात्र हाच निर्णय सात जणांनी दिला तर तो देशासाठी बंधनकारक राहील. जर प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे गेलं तर सुनावणी अजून एक महिना पुढे जाऊ शकते. कायद्यानुसार हे लोक अपात्र झाले तर कुठलाही मंत्री राहणार नाही किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री राहता येणार नाही, असे मोठे विधान उल्हास बापट यांनी केले आहे.