सतेज औंधकर, कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील सर्व कचरा कसबा बावडा परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा डम्पिंग केला जातो. वर्षानुवर्ष डम्पिंग केलेल्या कचऱ्याचे आता डोंगर तयार झाले आहेत. तरीही कोल्हापूर महानगरपालिका या कचरा निर्गतीकरणाकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी थेट डंपिंग ग्राउंड गाठत महापालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कचरा निर्गतीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत आहे. तरीही कचऱ्याचे डोंगर कमी न होता वाढत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आक्रमक झालेल्या राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. यावर नेहमीप्रमाणेच महापालिकेच्या अधिकारी हे थातूरमातूर उत्तर देत होते. हे पाहिल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
१५ दिवसात कचऱ्याच्या प्रश्न मार्गी लावा अन्यथा थेट महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा, राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच भविष्यात कोल्हापूरच्या या कचरा डम्पिंग ग्राउंडची मुंबईतील देवनार, ठाण्यातील दिवा तर दिल्लीतील रिंग रोड परिसरासारखी स्थिती होईल अशी, भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.