महाराष्ट्र

काय सांगता! स्वयंपाकघर तेलंगणात तर बैठक खोली महाराष्ट्रात; 'या' अनोख्या घराची तुफान चर्चा!

ऐकायला जरी नवल वाटत असलं तरी हे खरं आहे. सीमावादाच्या निमित्ताने या घराची आता चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अनिल ठाकरे | चंद्रपूर : महाराष्ट्रात एक असेही घर आहे. ज्या घरातील स्वयंपाक घर तेलंगणात आहे तर बैठक खोली महाराष्ट्रात आहे. झाले ना आश्चर्यचकीत. ऐकायला जरी नवल वाटत असलं तरी हे खरं आहे. सीमावादाच्या निमित्ताने या घराची आता चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. हे घर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील महाराजगुडा येथे. दहा खोल्यांचा या घरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत.

चंद्रपूर जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील १४ गावे सीमा वादात अडकली आहेत. या गावावर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात. या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये व कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात, असेही उदाहरण इथेच सापडते.

सीमावादात अडकलेल्या या गावांपैकी एक आहे महाराजगुडा. गाव बसलं आणि तेलंगणा सरकारने गावावर आपला हक्क सांगितला. तेलंगणा सरकारने राज्याची सीमा निर्धारित केली. ही सीमा गावाचा मध्यभागातून गेली आहे. त्यामुळं अर्ध गाव तेलंगणात तर अर्ध गाव महाराष्ट्रात आहे. दोन राज्याच्या सीमेने केवळ गावालाच विभागले नाही तर एका घरालाही विभागले आहे. या घराच्या चार खोल्या तेलंगणात गेल्या तर चार खोल्या महाराष्ट्रात आल्या आहेत. विशेष म्हणजे याच घरातील स्वयंपाक घर तेलंगणात गेलं. मात्र बैठक रूम महाराष्ट्रात आली आहे. तेलंगणा राज्याने आपली सीमा निश्चित केली असली तरी या सीमेला मान्यता नाही.

चंदू देवसिंग पवार, उत्तम देवसिंग पवार या दोन भावंडाच हे घर असून दहा खोल्या या घरात आहेत. एकूण अकरा सदस्य घरात राहतात. तेलंगणाने जी सीमा निश्चित केली आहे. त्यानुसार या घराच्या चार खोल्या तेलंगणात गेल्या आहेत. तर उर्वरित खोल्या महाराष्ट्रात आल्या आहे. सीमा वादात अडकलेल्या या गावात तेलंगणा सरकारने भरीव विकास कामे केल्याचे गावकरी सांगतात. तेलंगणा सरकारचा विविध योजनांचा लाभ येथील कुटुंब घेतात. त्यामुळे तेलंगणाकडे जाण्याचा कल गावकऱ्यांचा आहे. मात्र, जे सरकार जमिनीचे पट्टे देतील तिथे आम्ही राहू, असंही काही गावकऱ्यांनी सांगितलं.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा