ईडीनं दिल्लीच्या मद्य धोरणातील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं मुख्यमंत्र्यांना 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वी सीबीआयनं एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवालांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला दांडी मारली. ‘ईडी’ने पाठविलेले समन्स हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत केजरीवाल यांनी गुरुवारी ‘ईडी’ च्या कार्यालयात चौकशीसाठी जाणे टाळले.
मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने केजरीवाल यांना सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. भाजपच्या सांगण्यावरून ‘ईडी’ने समन्स बजावल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. हे समन्स बेकायदा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे त्यामुळे ते मागे घेतले जावे, असे केजरीवाल यांनी नमूद केले.
हे मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निघून गेले. ‘‘मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाऊ नये यासाठी भाजपने कट रचला आहे. त्यामुळेच ‘ईडी’च्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आहे,’’ असा आरोप केजरीवाल यांनी केला.