प्रत्येक महानगरपालिकेत सर्व क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने काम चालू केल्याने कामगारांच्या मनात आपल्याला मिळालेले काम हे कायम स्वरुपी नसल्याने निराशेची भावना होतीच. मात्र त्यात कंत्राटी कामगारांना पगारसुद्धा वेळेवर मिळत नसल्याने संतापाचा उद्रेक होताना दिसतोय.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या कल्याण पश्चिम 'ब' नं ३ प्रभागात असाच काहीसा प्रकार घडला. कंत्राटदाराने कामगारांना वेळेवर पगार न दिल्याने कचरा उचलणाऱ्या कामागारांनी काम बंद आंदोलन केले तथापि कचरा हा तेथेच पडून राहीला व स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या बद्दल तक्रार केली असता कामगारांनी काम बंद केल्याचे निदर्शनास आले,या घटनेची लोकशाही न्युजचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाठपुरावा केला असता कंत्राटदारांनी कामगारांना वेळेवर पगार दिल्याने हे पाउल उचलल्याचे कळाले.
प्रभाग ३ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यानी कचरा न उचलता त्या शेजारी कचऱ्याच्या गाड्या उभ्या करुन ठेवल्या त्यामुळे स्थानिक भागात दुर्गंधी पसरली होती. महापालिका कर्मचाऱ्यांइतकेच काम करूनही आम्हाला कंत्राटदाराकडून वेळेमध्ये योग्य प्रकारे पगार दिला जात नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान यासंदर्भात महापालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता हा कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड केला. ज्यामुळे कंत्राटदाराने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली,जी अत्यंत चुकीची बाब आहे. यापूढे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशाराही कोकरे यांनी दिला आहे.