बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असून भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून आणला असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.
बेळगावमध्ये मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही.कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असे राऊत म्हणाले.
बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् बेळगावात मराठी माणसाचा पराभवानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राचंया इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा झाला नाही. पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही, असं ते म्हणाले.