मुंबई : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यभरातील पत्रकार संघटनांनी लोकशाही चॅनेलचे संपादक कमलेश सुतार यांना पाठिंबा जाहीर करत सरकारवर टीका केली आहे.
पत्रकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहेत. किरीट सोमैय्या यांच्या व्हिडिओ प्रकरणातही हेच होताना दिसतंय. किरीट सोमैय्या यांनी या व्हिडिओचा इन्कार केला नव्हता. म्हणजे जे दाखविलं गेलं होतं ते सत्य आणि सत्यच होतं. तरीही किरीट सोमय्या यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. सत्य बातमी दाखवल्याबद्दल असा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्रात पत्रकारिता करणे अशक्य होईल. सरकार पत्रकारांवर असे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करीत आहे, असा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेने केला आहे.
कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करणे हा प्रामाणिक पत्रकारितेचा गळा घोटण्याचाच प्रकार आहे. पत्रकार सुतार यांच्यावरील या कारवाईचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तीव्र निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, पत्रकार मग तो दैनिकाचा असो की टीव्हीचा विविध प्रकारच्या गुन्ह्यात आडकविण्याच्या नेहमी प्रयत्न केला जातो. हाच प्रकार कमलेश सुतार यांच्या बाबतीत झाला आहे. सदर प्रकरणी करू तेवढा निषेध कमी आहे. या प्रकरणी टीव्हीजेए संघटना ही संपादक कमलेश सुतार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे आणि सचिव राजेश माळकर यांनी दिली आहे.
पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रकार निषेधार्थ असून याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध व्यक्त करतो. लोकशाहीने कायमच निस्पृह निःपक्षपातीपणे पत्रकारिता केली आहे. कमलेश सुतार सर यांचे पत्रकारिता नेहमीच राज्याला नवी दिशा देणारी व प्रेरणा देणारी ठरली असून त्यांच्या दाखल झालेला गुन्हा लोकशाहीत आम्हा कुणालाही मान्य होणार नाही, असे म्हणत अकोला श्रमिक पत्रकार संघाने कमलेश सुतार यांना पाठिंबा दर्शवला आहे.
कमलेश सुतार यांच्या विरोधात पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून तो त्वरित मागे घ्यावा आणि प्रसार माध्यमांची मुस्काटदाबी थांबवावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने केली आहे. तसेच, लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक,कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे करत याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
वार्तांकन करण्याबद्दल गुन्हा दाखल होणे हा पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. असे गुन्हे दाखल होत राहिल्यास लोकशाही देशात पत्रकारांना काम करणे अवघड होईल, अशा शब्दात पुरोगामी प्रसार माध्यमं संघाने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.