शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यामध्ये वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. बाबासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रामधून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यात आता बाबासाहेब पुरंदरे यांना वैचारिक पातळीवर उघडपणे विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केलंय.
जितेंद्र आव्हाड यांनी दुपारी ३ वाजून १७ मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये आपण माणूस म्हणून बाबासाहेब पुरंदरेंना कधीच विरोध केला नव्हता असं म्हटलं आहे. "माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही. काही लिखाणावर आक्षेप होता. ब. मो. पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.