प्रशांत जगताप|सातारा: पालकमंत्री शंभूराज देसाई माण, खटावला एकदाही आले नाही, असे वक्तव्य आमदार रोहित पवारांनी दहिवडी येथील सभेत केलं होत. या वक्तव्याचा जयकुमार गोरे यांनी समाचार घेतला आहे. रोहित पवारांच्या आणि शरद पवारांच्या तोंडून हे शब्द शोभत नाही, अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या लोकांनी या भागात कायम दुष्काळ रहावा अशी व्यवस्था केली आहे, त्या लोकांनी दुष्काळाबाबत बोलावं हेच हास्यास्पद आहे. रोहित पवार छोटे आहेत त्यांना मोठी स्पेस मिळाली आहे त्याचा ते वापर करत आहेत, असे सांगत जयकुमार गोरेंनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
अजित दादांना योग्यवेळी मुख्यमंत्री करणार असं रामराजे यांनी सांगितले. यावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, रामराजे कोणाला मुख्यमंत्री करतात हा त्यांचा विषय आहे. शरद पवारांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न रामराजेंनी बघितलं होतं, त्याच पद्धतीने अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच त्यांनी बोललं असल्याचं मी ऐकलं आहे. रामराजे पवारांच्या बाबत केलेलं वक्तव्य तेच अजित पवार यांच्याबाबत केला आहे त्यात माझा रोल नसल्याचे सांगत जयकुमार गोरे यांनी रामराजे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणे टाळले आहे.
चालू वर्षी सातारा जिल्ह्यासह राज्यातील काही ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. कोयना खोरे आणि महाबळेश्वर मध्ये यंदा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे भरली नाहीत. माण, खटाव तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून अनेक ठिकाणी चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर शासन गंभीर आहे. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी ताकदीने काम करावे लागणार असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील सूचना करण्यात आल्या असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे.