विकास माने, बीड
राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज परळी आणि माजलगावमध्ये असणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकातून अजित पवार यांची स्वागत मिरवणूक निघणार असून दुपारी तीन वाजता कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी पोहोचणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेची जाहीर सभा होणार असून परळीतील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या सभेतून अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. यासोबतच परळी आणि माजलगावमध्ये भव्य दुचाकी रॅली निघणार आहे. जनसन्मान यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर परळी गुलाबी रंगाने रंगली असून परळी शहरात अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आदिती तटकरे यांचे चाळीस फुटी बॅनर पाहायला मिळत आहेत.
यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पहिल्या हप्त्यातून बीडच्या परळीतील अक्षरा शिंदे यांनी लघुउद्योग सुरू केला. आर्टिफिशियल वटवृक्ष झाड तयार करून अक्षरा यांनी उद्योगाला सुरुवात केली. आज याच महिलेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.