मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला होते. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर, राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या संपूर्ण घटनेत सातत्याने येणारे नाव म्हणजे मनोज जरांगे-पाटील. हे नेमके आहेत कोण जाणून घ्या...
कोण आहेत मनोज जरांगे पाटील?
- मनोज जरांगे पाटील यांचे वय 41 वर्षे असून मूळ गाव शहगड आहे.
- ते मराठा मोर्चाचे समन्वयक असून गेले 20 वर्षे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.
- 2012 साली शहागडमध्ये आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 7 दिवसाचं आमरण उपोषण केले.
- 2013 साली शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली.
- जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी सहा दिवस उपोषण केले होते.
- अंबड तहसील कार्यालयासमोर तब्बल 11 वेळा त्यांनी उपोषण केले आहे.
- मागील 2 वर्षात जालन्यातील साष्टपिंपळगाव, भांबेरी, वडीकाळ्या आणि आता अंतरवली सराटीत पाच दिवसांपासून उपोषण केले.
काय घडले नेमके?
29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाची हाक दिली. चार दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरु होते. यादरम्यान अनेकदा प्रशासन आणि आंदोलकामध्ये चर्चा झाली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक ठाम होते. अशात, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण थांबवण्याचं प्रयत्न सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.