गोविंद साळुंखे | अहमदनगर : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेने मुळा धरणावर जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुळा धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्या. यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी देखील पाण्यामध्ये उड्या घेऊन आंदोलकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा, असा शासनाला 7 दिवसाचा अल्टीमेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेने दिला होता. मात्र, अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. यानुसार आंदोलक मुळा धरणावर पोहोचत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी मुळा धरणांमध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, धरण परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने धरणात उड्या घेतलेल्या चार आंदोलकांना पोलिसांनी पाण्यात जाऊन बाहेर काढलं आणि तात्काळ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.