बंगळुरू : कर्नाटकमध्ये भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपची साथ सोडत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या जगदीश शेट्टर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जगदीश शेट्टर यांनी आज बंगळुरू येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेट्टर यांनी हुबळी-धारवाड मध्यवर्ती मतदारसंघातून मागील 6 निवडणुका जिंकल्या आहेत. ते लिंगायत समाजातून आले असून त्यांचा त्यांच्या मतदारसंघात बराच प्रभाव आहे.
जगदीश शेट्टर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्षही राहिले आहेत. याशिवाय भाजपपासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा शेट्टर यांनी सांभाळली आहे. यंदा मात्र निवडणुकीचे तिकीट न दिल्याने नाराज झालेले जगदीश शेट्टर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु होता. सोबतच भाजपने त्यांना केंद्र सरकारमध्ये पदाची ऑफरही दिली होती, मात्र सर्व अपयशी ठरले.ृ
जगदीश शेट्टर यांनी भाजप पक्षप्रमुख जेपी नड्डा यांना पत्र लिहून त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे कळवल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, शेट्टर यांनी दावा फेटाळून लावत पक्ष असे म्हणत आहे.
दरम्यान, जगदीश शेट्टर हे जवळपास पाच दशकांपासून आरएसएस आणि भाजपशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपकडून नव्या नेत्यांना संधी द्यायची असल्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना अन्य जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. यापूर्वी बीएस येडियुरप्पा यांनाही पक्षाने मुख्यमंत्रीपद दिले नव्हते.