जातपंचायतीचा अजब कारभार
प्रतिनिधी / इगतपुरी
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून मुलीने दुसऱ्या जातीच्या युवकाशी लग्न केल्याने जातपंचायत आणि स्थानिक ग्रामपंचायतने जबरद्स्तीने लिखित पत्रावर सह्या घेऊन मुलीला आदिवासी समाजातील कोणतेही सवलती मिळू नये असे लिहून एका मागासवर्गीय आदिवासी मुलीचे अधिकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न झाला आहे. पत्रावर सरपंच आणि जात पंचायतीच्या इतर सदस्यांची स्वाक्षरी आहे.
नक्की काय लिहिलयं अर्जात ?
जोडप्याचं नाव आहे सोनाली एकनाथ कातवारे (Sonali Eknath Katware) (रा. रायंबे, ता. इगतपुरी) आणि मच्छिंद्र दोंदे. या दोघांचा विवाह 5 तारखेला इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील रायांबे या गावात झाला. मात्र गावातील सरपंच आणि जातपंचायतीच्या लोकांनी सोनालीकडून एक धक्कादायक अर्ज लिहून घेतला. या अर्जात लिहिलेला मसुदा असा आहे…
“”मी सोनाली एकनाथ खात वारे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे अनुसूचित जाती-जमातीच्या माझ्या सवलती बंद होण्याबाबत, मी मच्छिंद्र साहेबराव दोंदे याच्याशी स्वच्छेने लग्न केलं. यासाठी मी आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा याचे पालन केले नाही. मी आंतरजातीय विवाह 5 मे 2022 रोजी दुपारी बारा वाजता केला. माझा विवाह महेंद्र साहेबराव दोंदे (Mahendra Sahebrao Donde) यांच्याशी आंतरजातीय असून मच्छिंद्र दोंदे हे हिंदू-महार म्हणजेच एससी जातीचे आहेत मी अनुसूचित जाती जमातीची असून मी आंतरजातीय विवाह केला आहे. त्यामुळे मी यापुढे अनुसूचित जाती जमाती आदिवासी ठाकूर एसटी या जमातीच्या कुठल्याही सवलती नियमांमध्ये योजनेचा लाभ घेणार नाही, असे मी आदिवासी ठाकर समाजाला महाराष्ट्र राज्य आणि ग्रामपंचायत रायंबे त्यांना लिहून देते.
जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
जात पंचायतीने हे सर्व बळजबरीने लिहून घेत अधिकारांवर गदा आणल्याचा थेट आरोप आरोप थेट सोनालीने केला आहे.सोनालीच्या सासूनेही जात पंचायतीच्या कारभारावर टीका करून माझ्या सुनेकडून जबरदस्तीने सही घेतल्याचा आरोप केलाय. या जात पंचायतीच्या विरोधात आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला असून समितीने मुलीला न्याय मिळून देण्यासाठी आणि पत्र लिहून घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरोधात आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनीही चौकशीचे आश्वासन दिले आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनाली कातवारे या महिलेचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत आहे. सोनालीने समस्त आदिवासी ठाकर समाज महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत रायांबे यांना उद्देशून हा अर्ज लिहिला आहे. मच्छिंद्र या दलित युवकाशी लग्न करताना सोनालीने तिच्या आई-वडिलांना विश्वात घेतले नव्हते, आदिवासी समाजाच्या रुढी परंपरांचे पालन केले नव्हते, त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या आदिवासी जमातीच्या शासकीय, निम शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही असे अर्जात लिहून घेतले आहे. या संदर्भात जातपंचायत मुठ माती अभियानाचे राज्य कार्यवाह यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, "आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनुदान देते तर दुसऱ्या बाजुने ग्रामपंचायत अशा घटनांत शासकीय सवलती काढून घेण्याचे लिहून घेते. हे विरोधाभासी आहे.जात पंचायतचे पंच सुद्धा या प्रकरणात सामिल असल्याने संबधीत सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आम्ही करत आहोत " अशी मागणी केली आहे.