मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु असून उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अशातच, जालन्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत जालन्यात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद केली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियाचा वापर टाळण्यासाठी इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. यावर जरांगेंनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये कुणी काय केलं, हे आम्हाला माहिती नाही. पण, आंदोलन आधी आहे, नंतर तुमची संचारबंदी आहे. संचारबंदी बाजूला ठेवा, एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला तर मी इथून उठेन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर येऊन बसेल. जर काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे. मात्र, पत्रकार परिषद सुरु असतानाच जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी लोकप्रतिनिधी यांची घरे जाळ, दवाखाने जाळ, हॉटेल जाळ असे प्रकार घडत आहेत याची गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे. सर्व व्हिडिओ मिळालेले आहेत. यातील 50 ते 55 लोक ओळखता येत आहेत. 307 चे गुन्हे दाखल केले जात आहेत. कडक कारवाई केली जाईल. शांतता होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.