दहावीच्या निकालावेळी वेबसाईट क्रॅश झाल्यानंतर राज्य सरकार आणि शिक्षण मंडळावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. जवळपास ५ तास माध्यमिक शिक्षण मंडळाची वेबसाईट डाऊन झाली होती. यामुळे निकालाची अपेक्षा असलेल्या पालकांची निराशा झाली. या प्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी होत होती. कालच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी थेट जनतेची माफी मागितली. यानंतर त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
निकाल घोषित केलेल्या वेळेपेक्षा तब्बल सहा-सात तास उशिराने विद्यार्थ्यांच्या हातात पडला. त्यामुळे आता निकालाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी आता करण्यात येणार आहे. या परिस्थितीला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना समितीमार्फत होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
शिक्षण आयुक्त विशाल सोंळकी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन कार्यरत असले. यात माहिती व तंत्रज्ञान विभगाचे सचिव, उद्योग उर्जा व कामगार विभागाचे उपसचिव (उद्योग), शालेय शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार हे सदस्य, तर शिक्षण आयुक्त कार्यालयातील उपसंचालक (प्रशासन) हे सदस्य सचिव सहभागी असतील. या प्रकरणाची सखोल चौकशी करून समितीला येत्या १५ दिवसांत राज्य सरकारला अहवाल सादर करावा लागेल, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.