अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एपीआय सचिन वाझे यांचा गॉडफादर कोण आहे? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच यासर्व प्रकरणात वरुण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला.
देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधित आयपीएलचे सामने खेळवले गेले. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात आला. त्यावेळी वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. तुमचे लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापेमारी होऊ नये, असे वाटत असले तर, मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, त्यानंतर सचिन वाझे यांना एका व्यक्तीने फोन केला आणि या दीडशे कोटींपैकी आमचे किती, अशी विचारणा केली. या व्यक्तीला वाय प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे. राजकीय वर्तुळात त्याची ऊठबस असून पालिकेच्या टेंडरमध्येही त्याचे नाव असते, असा खबळजनक गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.
वरूण सरदेसाई असे या व्यक्तीचे नाव असून तो कोणाचा नातेवाईक आहे? कोणाच्या आशीर्वादाने त्याने फोन केले? त्याचा बोलविता धनी कोण आहे? या सर्वांची चौकशी एनआयएने करावी, अशी मागणी त्यांनी केली. एनआयए वरूण सरदेसाई यांचे सीडीआर तपासावे, व्हॉट्सअॅप कॉल तपासावेत. वाझे यांच्या मागे कोणाची ताकद आहे? वाझेंचा गॉडफादर कोण आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे वाझेंची वकिली का करीत आहेत, हे त्यानंतरच कळेल, असे नितेश राणे म्हणाले. वरुण देसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.
उपनगरातील शिवसेना नेत्याशी कनेक्शन
सचिन वाझे यांचे मुंबई उपनगरातील शिवसेनेच्या एका नेत्याशी कनेक्शन आहे. त्यांचे या नेत्याशी टेलिग्रामवर चॅटिंग झाले. एनआयएसमोर हजर होण्यापूर्वी वाझे सकाळी 11च्या सुमारास कोणत्या शिवसेना नेत्याला भेटले, याचाही तपास करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली.