अरबी समुद्रात आलेल्या तोत्के चक्रीवादळाने राज्यात धुमाकूळ घातला असून असंख्य जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातहि या वादळामुळे भले मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या अपघाताने 4 जणांचा बळी घेतला असून असंख्य जणांच्या घराचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे उद्या 18 मे पासून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
तोत्के चक्रीवादळामुळे उरणमधल्या दोघा भाजी विक्रेत्या महिलांचा मंदिराची भिंत कोसळून मृत्यू झाला. तर पेण गागोदे इथं रामा कातकरी या आदिवासी वृद्धाचा तर रोह्यात रमेश साबळे या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय. असे एकूण रायगड जिल्ह्यात 4 जणांचा बळी गेला आहे. या मनुष्यहानीसह वित्तीयहानीही झाली आहे.
जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णपणे नुकसान झालंय. चक्रीवादळाने जिल्ह्यातील 500 हुन अधिक विजेचे खांब कोसळलेत. अलिबाग आणि मुरुडमधील वीजपुरवठा अद्यापही खंडित असून तो पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात झालेली हि हानी पाहता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे काम उद्याच म्हणजे मंगळवार पासून सुरु करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच अपघातग्रस्तांना सरकारी नियमानुसार मदत दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.