चंद्रशेखर भांगे | पुणे : पोलिसांनी गस्तीदरम्यान पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यात इसिसचे जाळे हे सिरीयातून हॅन्डल केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी वेगवेगळे हॅण्डलरचा वापर करून इसिसची विचारधारा पसरविण्याचे काम सुरू असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात समोर आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे मिळालेले इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि गॅझेट यांच्या माध्यमातून याचे कनेक्शन सिरीयाशी असून तेथूनच भारतीतील इसिसची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.
कोथरूड भागातून पोलिसांनी गस्तीदरम्यान दोन दहशतवाद्यांना पकडले होते. त्यांच्या चौकशीमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांना देशात 26/11 पेक्षा मोठा हल्ला घडवून आणायचा असल्याचेही आता समोर आले आहे. त्याची तयारी सुरू असतानाचा पुणे पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. एनआयएच्या तपासामध्ये आरोपी हे इसिसचे सदस्य असून त्यांचा लोकांमध्ये दहशत माजविण्याचा तसेच भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहचविण्याचा उद्देश होता. एनआयएच्या तपासात पुणे मोड्युलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन परदेशात म्हणजेच इसिसचा गड मानल्या जाणार्या सिरीया देशातून बसून हे दशतवादीकृत्य सुरू असल्याचा कट उघड झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
भारतात अतिरेकी विचारसरणीचा प्रचाराचे गुंतागुंतीचे नेटवर्क तपासात उघड झाले आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी इसिसचा म्होरक्या खलिफा याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतल्याचेही समोर आले आहे. दहशतवादी आयडी बनवून दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा व भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू होता. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यामध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी केल्याचेही आढळून आले आहे. त्यांच्याकडे आईडी, पिस्तुल, दारूगोळाही सापडला आहे. दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन, बॉम्बस्फोट केल्यानंतर अटक टाळण्यासाठी कोठे लपायचे याचा देखील प्लॅन आखल्याचे नुकताच इसिसच्या पुणे मोड्युलच्या अनुषंगाने दाखल झालेल्या आरोपपत्रातून समोर आले आहे.