मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर ठेपली असतानाचं विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा सूरू झाला आहे. त्यामुळे शहरात श्रेयवादाची लढाई रंगू लागली आहे. दरम्यान आज पर्यावरण मंत्री व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दहिसरमधील एका नाल्यावरील पुलाचे उद्घाटन होणार होते. मात्र या नियोजित उद्घाटना आधीच भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी पुलाचे उद्घाटन उरकले आहे. या उद्घाटनाने शहरात श्रेयवादाचा संघर्ष पाहायला मिळाला.
राज्यात शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर महा विकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात सातत्याने संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेच्या विकास निधीतून दहिसर पूर्वेकडील आनंद नगर येथील शिवाजी कॉम्प्लेक्स रेसिडेंट असोशियन इमारती जवळील नाल्यावर पूल बांधण्यात आला. या पुलाचे उद्घाटनावरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज दहिसर येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार असल्याचे समजताच भाजप आमदार मनीषा चौधरी व नगरसेवक जगदीश ओझा यांनी या पुलाचे उद्घाटन उरकून घेतले. यासोबतच दहिसर नदी पुलावरील सायकल ट्रॅक आणि नदीच्या भिंतीचे सौंदर्यीकरण यासोबतच शिवराज लाईन बनवण्याचा कामाचे देखील आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले