राज्यातील नागरिक आधीच महागाईमुळे हैराण झाले आहे. आता सणासुदीच्या दिवसात मुंबईकरांना महागाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. दुधासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे ताज्या दुधाच्या किमतीत पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक महासंघाने घेतला आहे.
अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबई दूध उत्पादक महासंघाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत. जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. मुंबई दूध उत्पादक महासंघाचे सदस्य सी के सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईत दर दिवशी सात लाख लिटर सुटे दूध विकले जाते
मुंबईत सुट्या दूध उत्पादन व्यवसायावर बारा हजार लोक अवलंबून आहेत. तर दर दिवशी सुटे ताजे दूध सात लाख लिटर विकले जाते. त्याची आधी किंमत ही एक लिटरसाठी 75 रुपये इतकी होती. आता ती 80 रुपये इतकी होणार आहे. या आधी नुकताच अमूलने देखील त्यांच्या दुधाच्या किमतीमध्ये वाढ केली होती. अमूल दुधाच्या नवीन किमती 17 ऑगस्टपासून लागू झाल्या आहेत.